आपुलिया हिता जो असे जागता


आपुलिया हिता जो असे जागता |

धन्य मातापिता तयाचिया ||१||

कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक |

तयाचा हरिख वाटे देवा ||२||

     चांगल्या मार्गाचा अवलंब करून जो स्वतःचं हित कशात आहे हे जाणतो,आपल्या हितासाठी नेहमी जागरूक असतो तो जीवनात यशस्वी होतो.अशा मुलामुलींचे आईवडील खऱ्या अर्थाने धन्य असतात.मुलं अपयशी ठरली किंवा वाममार्गाला लागली तर सारेजण त्यांच्या आईवडिलांना नावे ठेवतात. मुलांच्या अगोदर त्यांच्या आईवडिलांना दूषणे दिली जातात. त्याचप्रमाणे मुलं यशस्वी झाली, संस्कारी निघाली,सन्मार्गाला लागली तर सर्वजण त्यांच्या आईवडिलांना नवाजतात.खरं म्हणजे मुलं घडवण्यामध्ये आईवडीलांचा खूप महत्वाचा वाटा असतो.

              'शुद्ध बीजपोटी

               फळे रसाळ गोमटी !'

महत्त्वाचे संस्कार मुलामुलींना घरातूनच मिळत असतात.आई वडील संस्कारी असतील तर मुलंही संस्कारी निवडतात.बीज शुद्ध असेल तर त्यापासून येणारे झाड चांगले आणि फळ रसाळ ,गोड असतं.

         ज्या मुलामुलींना आपलं हित ,आपला फायदा कशात हे समजते,आपल्या फायद्यासाठी जे नेहमी सतर्क, सावधान असतात.असे कन्यापुत्र सात्विक,संस्कारी लेकरं ज्या घरी जन्माला येतात ते घराबरोबर आपल्या साऱ्या कुळाचाही उद्धार करीत असतात. अशा मुलामुलींचा देवालासुद्धा अभिमान वाटतो. मुलामुलींनी आजपासून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे.आपलं तारुण्य हे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी असतं.आपल्या यशाच्या पताका फडकवण्यासाठी असतं.गेलेला वेळ कधीच पुन्हा येत नसतो.एकदा महत्वाची वर्षे हातातून गेली की पुन्हा जीवनभर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच उरत नाही.काहीजण दुसऱ्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात.चमकणाऱ्या, आकर्षीत करणाऱ्या सैराट गोष्टींच्या मागे लागतात.अभ्यास सोडून नको त्या गोष्टी त्यांना आवडू लागतात.चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते हे त्यांच्या लक्षात येत नाही.कधीकधी ती गोष्ट काच निघते.पायात अशी रुतते की त्याचा खूप त्रास होतो.वेळही निघून गेलेली असते.

आपल्या सोन्यापेक्षा अनमोल आयुष्याची स्वतःच माती केलेली असते.जीवनाचं वाटोळं होऊन बसतं.आई वडिलांना मुलामुलींच्या अशा वागण्यामुळे समाजात मान खाली घालावी लागते.पदोपदी त्यांना अपमान सहन करावा लागतो.आपल्या आईवडिलांची मान चारचौघात ताठ राहिली पाहिजे अशीच आपली कृती हवी.

         आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव नेहमी घेतो.त्यांनी आपल्या आईवडिलांना अभिमान वाटेल असेच कार्य केले.त्यांचं ज्यावेळी आपण नाव घेतो त्यावेळी खरा गौरव 'शहाजीराजे-जिजाऊ' यांचा असतो.संत तुकाराम महाराज असतील किंवा गौतम बुद्ध खऱ्या अर्थाने त्यांचे आईवडील धन्य आहेत.जालना जिल्ह्यातील अन्सार शेख नावाचा अत्यंत गरीब परिस्थिती असणारा मुलगा वयाच्या एकविसाव्या वर्षी जिल्हाधिकारी झाला.त्याचे वडील साधे रिक्षाचालक आहेत.

आई गृहिणी आहे.आपली गरिबी आहे म्हणून तो रडत बसला नाही. तो झगडला, अभ्यास केला,आपलं हित कशात आहे हे त्याने जाणले.स्वतः मोठा झालाच पण आपल्या साऱ्या

 खाणदाणाचं नाव मोठं केलं.खरोखरच त्याचे आईवडील धन्य आहेत.आजपासून आपणही हेच ठरवायचं आहे की फालतु गोष्टीत वेळ न घालवता स्वतःचा विकास करून घ्यायचा. आपल्या आवडत्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचं.आकाश खूप मोठं आहे पाहिजे तेवढी मोठी झेप घ्यायची.प्रथम स्वतःला स्वतःचा अभिमान वाटेल असं वागायचं जग आपोआप

तुमचा उदोउदो करील.

-श्रीकृष्ण उबाळे, बीड

 मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'