शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ

शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ

शुभ झाल्या दिशा अवघाचि काळ |
अशुभ मंगळ मंगळाचे ||१||
हाताचीया दीपे दुराविली निशी |
न देखीजे कैसी आहे ते ही ||२||
सुख दुःखाहूनी नाही विपरीत |
देतील आघात हितफळे ||३||
तुका म्हणे आता आम्हासी हे भले |
अवघेचि झाले जीव जंत ||४||

          भारतीय समाज हा अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात मानणारा समाज आहे.योग चांगला आहे किंवा नाही, मुहूर्त चांगला आहे किंवा नाही.या गोष्टींचा विचार नेहमी केला जातो. प्रत्येकाचे लग्न जुळवताना लग्न तिथी असते ती घडी , लग्न वेळ त्याला मुहूर्त म्हटले जाते. त्याच वेळी लग्न होणे अपेक्षित असते पण माझ्या पाहण्यात आजपर्यंत एकही लग्न ठरलेल्या मुहूर्तावर झाल्याचे मला ज्ञात नाही.मग त्या कुणाचे काही वाईट झाले का ? विद्यार्थिदशेपासून या बाबींचा विचार करायला हवा.अंधश्रद्धा आपल्या प्रगतीमधील मोठा अडथळा आहे. महान गणिती रामानुजन हा अंधश्रद्धेचा बळी गेला.कोणताच काळ किंवा कोणतीच दिशा वाईट नसतात. सर्व दिशा आणि सर्वकाळ शुभ आहेत.आपलं काम करायचं ना मग कधीही सुरू करा.प्रत्येक क्षण ,दिवस, प्रत्येक दिशा शुभ आहे. सारेजण ज्याला अशुभ समजतात ती प्रत्येक गोष्ट चांगल्यातील चांगली आहे.
        जे लोक शुभ अशुभ मानतात त्यांचं कारण त्यांचे अज्ञान असतं. हातात जर प्रकाशाचा दिवा घेतला तर रात्र कशी आहे तेही दिसत नाही.प्रकाशाने अंधार इतका दूर जातो की तो कसा असतो हे कळतही नाही, दिसतही नाही. या ठिकाणी दिवा हा ज्ञानाचा आहे आणि निशी,रात्र,अंधार म्हणजे अज्ञान आहे.एकदा का ज्ञानरुपी दिवा हातात आला की शुभाशुभ, अंधश्रद्धांचा यांचा अंधार दूर होतो.माणसाला फक्त तो ज्ञानदिवा समजला पाहिजे. मग शुभाशुभ नावाची दिशा,काळ राहत नाही.साऱ्या गोष्टी मनाच्या मानण्यावर असतात.एकदा अज्ञानाचा अंधार दूर झाला की प्रत्येक गोष्ट शुभ वाटायला लागते.त्यावेळी दुःखाचे रुपांतर आपोआप सुखात व्हायला लागते.मनावर होणारे आघातसुद्धा हितकारक वाटू लागतात.आघातांमुळे मन तयार होईल,मजबूत बनेल. आपल्या जीवनात ज्यांना यशस्वी व्हायचय,ज्यांना जीवनाचे उद्दिष्ट गाठायचंय त्यांनी आजपासून ही गोष्ट लक्षात घ्यावी की अंधविश्वास सोडला की दुःखाचे रूपांतर सुखात व्हायला सुरुवात होते.मनावर आघात झाले तरी त्यामुळे चांगले परिणाम होतात.तुकाराम महाराज म्हणतात दिशा,काळ याच गोष्टी नाही तर सारे जीवजंतू सुद्धा भले भले आहेत.कोणीही अशुभ नाही.
       छत्रपती शिवाजी राजे यांचं आपण उठता-बसता नाव घेतो. त्यांनी काळ-वेळ,दिशा, शुभ-अशुभ मानल्या नाहीत. उलट अमावस्या त्यांची शुभ रात्र असायची.त्यांच्या बऱ्याच मोहिमा अमावसेला पूर्ण झालेल्या आहेत. त्याचे कारण स्पष्ट आहे अमावस्येला काळोख जास्त असतो.त्यामुळे शत्रूला आपल्या हालचाली दिसत नाहीत. हीच भावना त्यामागची होती. त्यांनी प्रत्येक दिशेला, प्रत्येक क्षणाला शुभ मानलं,मोलाचं मानलं ते त्यांच्या जीवनात यशस्वी झाले.आपण उठता-बसता 'जय भवानी जय शिवाजी' म्हणतो आणि मुहूर्त पाहतो. असं जर आपण करत असू दिशा , काळ यांना शुभ अशुभ मानत असू तर आपण एक नंबरचे करंटे आहोत.छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही एवढीच गोष्ट ध्यानात घ्यायला हवी.

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'