उभा ऐल थडी
उभा ऐल थडी
उभा ऐल थडी | तेणें घालू नये उडी ||१||
पुढे गेल्याचे उपाय | करावे ते केले काय ||२||
दिसते आहारी | नये जाऊ ऐशावरी ||३||
आळसाचे धाडी | तुका म्हणे बहु नाडी ||४||
नदीला खूप पाणी असेल आणि नदी तरुन एका तीरावरून पलीकडे दुसर्या तीरावर जायचं असेल. हे काम करण्यासाठी मनामध्ये हिंमत असावी लागते. हिम्मत नसताना उगाच मारायची म्हणून पाण्यात उडी मारू नये. आपल्या मनाची तयारी नसताना, योग्य ती तयारी नसताना उडी मारू नये. त्यासाठी प्रथम मनाची पक्की तयारी करावी. उडी मारण्याच्या इतर गोष्टी माहिती करून घेऊन पाण्यात उडी मारायची. याचा सरळ अर्थ असा कुठलीही गोष्ट करायची म्हणून करायला नको. योग्य सराव,योग्य तयारी, मनाचा पक्का निर्धार व्हायला हवा. नाही तर मनाची तयारी नाही आणि पाण्यात उडी घेतली तर मधेच लटकून बसण्याची,वेळ प्रसंगी बुडून मरण्याची वेळ येऊ शकते.दुसऱ्या तीरावर पोचण्याचा विचार सोडूनच दिलेला बरा.आपल्या अगोदर पाण्यात उडी मारून यशस्वीपणे पैलतीराला पोचले आहेत त्यांनी काय काय प्रयत्न केले ते नीटपणे समजून घेऊन त्या मार्गाने आपण सहज पोहोचावं. योग्य तयारी न करता आणि पलीकडे जाणे आपल्याला सहज साध्य होऊ शकते अशी स्वतःची समजूत करून घेऊन पाण्यात उडी मारणे हा योग्य मार्ग नाही. त्यामुळे पैलतीरी जाण्यात यश मिळणार नाही. कुठल्याही बाबीची तयारी न करता आळस आणणे किंवा सराव तयारीचा आळस करणे ही गोष्ट माणसाला यश मिळवण्यापासून रोखणारी आहे.
छत्रपती शिवाजी राजांना औरंगजेबाने भेटीला बोलावले आणि लगेच तेथेच नजरकैदेत ठेवले.राजांसमोर मोठे संकट होते. ते पार कसं करायचं ? संकटरूपी नदी कशी पार करायची ? हा मोठा गंभीर प्रश्न उभा होता. त्यांनी गडबड घाई करून कुठलीही तयारी न करता निसटण्याचा प्रयत्न केला असता तर तेथेच त्यांचा जीव गेला असता. ते पकडले गेले असते. त्यांनी अगोदर तयारी केली, नियोजन केलं. प्रथम त्या संकटातून पार जाण्यासाठी मनाचा पक्का निश्चय केला आणि मग बादशहाच्या हातावर तुरी दिल्या.त्यांनी मागचा पुढचा विचार न करता काही केले असते तर पुढचा इतिहास निर्माण झालाच नसता.अफजल खान नावाचं मोठं संकट स्वराज्यावर चालून आलं.त्यावेळी त्यांनी लगेच प्रतिकार केला नाही.अगोदर स्वतः सक्षम बनले.योग्य तयारी केली.अफाट सैन्यासह आलेला अफाट अफजल खान याच मातीत गाडला.यशासाठी त्यांनी माघार घेणे, अंगरक्षकाचे निवड,शस्रांची निवड, कपडे,सहकारी या सर्व बाबींचा विचार करून खानाचे संकट दूर करून स्वराज्य वाचवले. त्याच्या जागी त्यांनी खानाला लगेच प्रतिकार केला असता.समोरासमोर युद्ध केले असते तर राजे टिकाव धरू शकले नसते. यशस्वी माणसे नेहमी कोणतीही कृती विचारपूर्वक नियोजन करून संपूर्ण तयारी करून कृती करतात.मोघमपणाला,घाईला ते वाव देत नाहीत.
शिवरायांच्या तेजस्वी मार्गाचा वापर नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिसिंह नाना पाटील, उमाजी नाईक यांनी इंग्रजांशी लढण्यासाठी केला.व्हिएतनाम या देशावर अमेरिकेने हल्ला केला तेव्हा तेथील राष्ट्रपती 'हो ची मिन्न' हे होते.त्यांनी शिवरायांच्या 'गनिमी कावा' या शिवतंत्राचा वापर करून बलाढ्य असणार्या अमेरिकेला पराभवाची धूळ चारली.लक्षात घ्या महापुरुष जयंती, जात धर्मापुरते वापरायचे नसतात. त्यांनी सांगितलेले यशाचे मार्ग स्वीकारून त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करन यश मिळवावं लागत.
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment