मुंगीचिया घरा कोण जाय मूळ

मुंगीचिया घरा कोण जाय मूळ

मुंगीचिया घरा कोण जाय मूळ ? |
देखोनिया गूळ धाव घाली ||१||
याचकाविण काय खोळंबला दाता ? |
तोचि धावे हिता आपुलिया ||२||
उदक अन्न काय म्हणे मज खा ये |
भुकेला तो जाये चोजवीत ||३||
व्याधी पीडिला धावे वैदयाचिया घरा |
दुःख परिहारा आपुलिया ||४||
तुका म्हणे जया आपुले स्वहित |
करणे तोचि प्रीत धरी कथे ||५||

       गुळ हे मुंगीचं आवडतं खाद्य असतं.पण  गुुुळाकडून कुणी मुंगीला 'ये गूळ खा' असं निमंत्रण, निरोप पाठवलेला नसतो. गुळाला काही गरज नसते तर मुंगीलाच गरज असते. मुंगीला आपली गरज समजते आणि गुळ कोणत्या घरात, कोणत्या डब्यात ठेवलेला आहे त्याचा शोध घेऊन गुुळाकडे बरोबर धाव घेते. मुंगी किती लहान प्राणी आहे तिचा मेंदू किती लहान असेल. तरीही तिला स्वतःचे हित समजतं. आपण तर या जगातील सर्वात प्रगत असणारे माणसं आहोत.आपल्याला स्वतःचा फायदा , हित कशात आहे ही गोष्ट समजायला हवी.याचक आणि दाता यांच्यासोबतही हीच स्थिती असते. दाता काही याचकाविनाा खोळंबलेला नसतो.तो काही घरोघरी जाऊन 'दान घ्या,दान घ्या' असा ओरडत नसतो.ज्याला गरज असते तोच त्याचा शोध घेऊन आपला फायदा करून घेत असतो.पाणी काही लोकांकडे जाऊन 'या मला प्या' अशी जाहिरात करत हिंडत नाही.त्याला तहान लागलेली असते तोच पाण्याचा शोध घेतो आणि आपली तहान भागवत असतो.अन्नही 'या या मला खा' असा कधी प्रचार करत नाही. ज्या कोणाला भूक लागलेली असेल तो आपसूक अन्नाचा शोध घेऊन अन्नाकडे जातो.एखादा मनुष्य आजारी असेल आणि त्रासामुळे त्याची बेेजारी होत असेल तर तोच स्व:ताहून डॉक्टर कडे जात असतो. डॉक्टर घरोघरी जाऊन 'कोणाच दुखतय का औषध घ्या, इंजेक्शन घ्या' असा तपास घेत हिंडत नसतो. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचं आहे त्याने योग्य शिक्षक, मार्गदर्शक यांचा शोध घ्यायला हवा. मुंगी -गूळ ,दाता-याचक, पाणी- तहानलेला,अन्न- भुकेलेला,डॉक्टर -पेशंट, मार्गदर्शक -विद्यार्थी यांच्या उदाहरणांतून संत तुकाराम महाराज यांनी आपले हित कशात आहे या गोष्टीचा शोध स्वतः घेऊन स्वतःच धडपड केली पाहिजे. आपला फायदा,आपले हित साधले पाहिजे आणि जीवनात यशस्वी झाले पाहिजे. लक्षात ठेवा जीवनात यशस्वी तोच होतो त्याला स्वतःचे हित समजते आणि तो आपल्या हिताच्या गोष्टींचा शोध घेऊन त्याचा उपयोग स्वतःच्या जीवनात करतो.आपले हित कशात आहे हे शोधणारा आणि फायदा करून घेणारा धन्य असतो
   'आपुलिया हिता जो असे जागता
    धन्य माता पिता तयाचिया'
       चांगल्या उत्तम निर्मळ मार्गाचा अवलंब करून जो स्वतःच्या भल्यासाठी जागरूक असतो स्वतःचं हित कशात आहे हे ज्याला समस्त खऱ्या अर्थाने त्याच्यावर संस्कार करणारे त्याचे आई-वडील धन्य असतात. मुलं नालायक निघाली तर लोक त्यांच्या आई बापाला दोष देतात. त्याचप्रमाणे समाज ज्यांची मुलं कर्तव्यनिष्ठ राहतात, स्वतःची प्रगती करून घेतात, समाजाला दिशा देतात त्यांच्या आई-वडिलांचाही गौरव, आदराने नाव घेतात.प्रत्येकाने या ठिकाणी विचार करावा की आपले हित कशात आहे आणि त्याप्रमाणे वागून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करायचे आहे.
          एका माणसाला पैशाची गरज पडली म्हणून तो गावातील श्रीमंत शेठजींकडे गेला. शेटजीने त्या माणसाला येण्याचे कारण विचारले तो म्हणाला, "मला काही पैशाची गरज आहे म्हणून आपणाकडे आलो आहे." हे ऐकून शेटजीनी त्या माणसाला बारा वाजता येण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या माणसाने दुपारी बारा वाजता आपल्या लहान मुलाला शेठजींकडे पैसे आणण्यास पाठवले. हा मुलगा माडीवर शेठजी बसले होते तेथे जिना चढून वर गेला.शेठजींना म्हणाला, "माझ्या वडिलांनी पैशासाठी तुमच्याकडे पाठवले आहे." एवढे बोलून तो थांबला नाही तर शेठजी कडे पाहून हसला. शेटजींनी हसण्याचे कारण विचारले तर म्हणाला, "शेठची मला तुमच्याकडे पाहून हसू आले कारण तुमच्या माडीला  जिना खूपच लहान आहे व तुमचे पोट खूपच मोठे आहे . समजा तुम्ही मेलात तर तुमचे एवढे मोठे धड जिन्यातून न्यायचे कसे ? शेठजींना राग आला. त्यांनी त्या मुलाला लाथांनी मारून घरात कोंडून टाकले. मुलगा बराच वेळ होऊनही येईना म्हणून त्या माणसाने आपल्या मोठ्या मुलाला पाठवले. तो आला विचारू लागला , "माझा भाऊ आला होता काय ?"शेठजीं रागावून म्हणाले," त्याला पैशासाठी पाठवले की माझी चेष्टा करायला ? तो म्हणतो तुम्ही मेलात तर या छोट्या जिन्यातून तुमचे धड बसायचं कसं ? असा मूर्ख माझ्याकडे कशाला पाठवला ? "आता हा तर त्याचा मोठा भाऊ होता तो म्हणतो," द्या सोडून त्याचे काय मनावर घेता ? त्याला काय कळतं ? शेठजी मेले तर आपण हातपाय तोडून बाहेर काढले असते." शेठजींचा माथाच हलला. शेटजींनी यालाही चोप देऊन कोंडून टाकले .दोघेही येईना तेव्हा तिसरा मुलगा शेठजींकडे आला.भावांची चौकशी करू लागला तेव्हा शेठजी म्हणाले,"काय तुझे भाऊ बावळट आहेत, एक म्हणतो शेठजी जाड आहेत. मेल्यावर खाली न्यायचे कसे ? तर दुसरा म्हणतो आपण हात-पाय तोडून खाली नेऊ. तेव्हा तिसरा म्हणतो,"जाऊ द्या ना शेठजीं त्यांचे काय ऐकता त्यांना काय कळते, आपण हात पाय न तोडता माडीला येथेच पेटवून दिले असते. त्यांना काय करायचे होते ?" शेठजींनी यालाही यथेच्छ मार देऊन कोंडून टाकले.
            काही मूर्ख लोकांना आपले हित कशात आहे हे कळत नाही.ते जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. म्हणून लक्षात घ्या आपलं हित कशात आहे हे पहिल्यांदा ओळखा. अभ्यास करण्यात हित आहे की, उनाडक्या करण्यात हित आहे की आणखी कशात आहे ? हे चांगलं ओळखा आणि ओळखून थांबू नका तर त्याप्रमाणे वागा. यश तुमच्याच हातात आहे.

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'