तांबियाचे नाणे
तांबियाचे नाणे
तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले |
जरी हिंडवीले देशोदेशी ||१||
करणीचे काही न मने सज्जना |
यावे लागेल मना वृद्धांचिया ||२||
हिरियासारिखा दिसे शिरगोळा |
पारखी ते डोळा न पाहती ||३||
देऊनिया भिंग कमाविले मोती |
पारखिया हाती घेता नये ||४||
तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ |
आपुले हे चित्त आपणा ग्वाही ||५||
तांब्याचं नाणं सोन्याच्या किमतीमध्ये चालू शकत नाही.जरी आपण त्याला खोटंखोटं सोनं म्हटलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळ्या देशात नेलं तरी त्याला सोन्याची किंमत मिळू शकत नाही. एखाद्याची पारख करायची असेल तर त्याचा वरवरचा वेश पाहून उपयोग नाही. एखादी व्यक्ती खोटी डुप्लिकेट असेल.तिच्या वरच्या दिसण्यावरून तिला सज्जन समजायचे नाही.अनुभवी लोकांचं त्याबद्दल काय मत आहे हे पाहावं.अनुभवी लोक बरोबर पाहताक्षणी ओळखतात पुढचा माणूस कसा आहे. एखाद्यानं कितीही सज्जनपणाचा आव आणला तरी अनुभवी त्याला लगेच पारखतात. गारगोटीचा गोळा हिऱ्यासारखा दिसला म्हणून जाणकार त्याला हिरा समजत नाहीत. जाणकार गारगोटी कडे पाहत सुद्धा नाहीत. काचेचा मोती मोती समजून दिला तर त्याला पारखी हातात सुद्धा घेत नाहीत.तुकाराम महाराज म्हणतात आपण उगाच नटून उपयोग नाही.स्वतःच्या मनाला स्वतःची लायकी चांगली माहित असते.दुसऱ्याने आपणास उघड पाडण्यापेक्षा स्वतः सुधारण्यात खरा पुरुषार्थ आहे.तांब्याचे नाणे-सोन्याचे नाणे, खोटारडा -सज्जन ,गारगोटी- हिरा,काच- मोती या विविध उदाहरणांमधून संत तुकाराम महाराज यांनी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आहे की जे आपण नाही ते दाखवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा काडीचाही उपयोग नसतो. खोटेपणा उघडा पडतो दुसऱ्यांनी उघडा पाडण्यापेक्षा स्वतःच्या क्षमता स्वतःला चांगल्या माहीत असतात. त्याचा स्वीकार करायला हवा.आई-वडिलांना सांगायचे मला ट्युशन लावा, स्वतंत्र अभ्यासाला खोली द्या, ग्रुपचे क्लास लावा.आई-वडील साऱ्या गोष्टी पूरवतातही.पण मनातून अभ्यास करण्याची इच्छा नसेल आणि अभ्यास केलाच नाही तर आपण अभ्यासाचा कितीही आव आणला तरी परीक्षेचा निकाल लागल्यावर सारा खेळ उघडा होणार आहे.स्वतःच्या क्षमता ओळखून योग्य त्या ठिकाणी प्रवेश घेऊन मनातून प्रयत्न केला तर अपयशाची वेळ येणार नाही.
एका गावात एक माणूस होता. गावातले सर्व लोक त्याला 'मूर्ख नालायक' या नावाने हाक मारायचे.तो एकदा गावावर नाराज झाला आणि त्यानं ठरवलं की अशा गावात जायचं जिथे आपलं 'मूर्ख नालायक' हे नाव कोणाला माहितच नाही. तो प्रवास करत खुप दूर एका गावाच्या जवळ पोचला.दुपारची वेळ होती.तो नदीतून चालला होता.उन्हाळ्याचे दिवस असल्याने तो घामाघूम झालेला होता. त्याला तहानही लागली होती.तेवढ्यात त्याला नदीत पाण्याचा झरा दिसला.प्रथम त्यांने पाणी पिले आणि पायाला आराम मिळावा म्हणून पाय सोडून बसला.त्या गावात पाण्यासाठी तो एकमेव झरा होता.पिण्याचे पाणी नेण्यासाठी दोन बाया येताना दिसल्या.त्यांनी याला पाण्यात पाय सोडलेल्या अवस्थेत पाहिले. एका बाईला राहावले नाही ती दुसरीला म्हणाली, "बघ सारा गाव पाणी पितो आणि हा 'मूर्ख नालायक' पाय सोडून बसलाय पाण्यात..!" तो माणूस उठला आणि म्हणाला, "माझं 'मूर्ख नालायक' नाव तुम्हाला कोणी सांगितलं ?" ती बाई म्हणाली तू 'मूर्ख नालायक' आहेसच.कोणाची सांगायची गरज नाही." आपल्यातील खोट कितीही लपवली तरी खोट ती खोटच असते.दुसऱ्याने सांगण्यापेक्षा आपण स्वतःला ओळखून योग्य ते बदल घडवून आणले पाहिजेत.नाहीतर आपला खोटेपणा कितीही आव आणला तरी तो उघडा पडत असतो. ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी.
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment