दधिमाजी लोणी


४.दधिमाजी लोणी

दधिमाजी लोणी जाणती सकळ |

ते काढी निराळे जाणे मंथन ||१|| 

अग्नी काष्टामाजी ऐसे जाणे सकळ |

मथिलीयाविण कैसा जाळी ? ||२||

तुका म्हणे मुख मळीण दर्पणी |

उजळील्यावाचून कैसे भासे ?||३||

       दह्यामध्ये लोणी असतं हे सार्‍यांना ठाऊक असतं. ते दह्यापासून वेगळं कसं करायचं ? याचीही माहिती सर्वांना असते.पण जो त्याच मंथन करतो, त्याला घुसळवतो तोच ते काढू शकतो.प्रयत्न केल्याने यश मिळतं , व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते, नियमित अभ्यासाने अपेक्षित निकाल लागतो हे सार्‍यांना समजत असतं.साऱ्यांना त्याचे अभ्यास, व्यायाम,प्रयत्न यांचं महत्त्व तसेच विविध मार्गही माहीत असतात. परंतु यशाचं लोणी त्यालाच मिळतं जो नियमित प्रत्यक्ष प्रयत्न करतो. नुसते मार्ग माहीत असून उपयोग नाही.नुसते ज्ञान असून उपयोग नाही.ज्ञानाचा उपयोग जेव्हा प्रत्यक्ष केला जातो तेव्हा खरा लाभ,खरे फळ आपणास मिळत असते. लाकडामध्ये अग्नी असतो याचे ज्ञान सर्वांना असते. परंतु घर्षण केल्याशिवाय त्याचा जाळ कसा निर्माण होईल ? म्हणजे संघर्ष , प्रयत्न याशिवाय काही साध्य होत नाही.प्रयत्नांशिवाय 'दे रे हरी पलंगावरी' कोणीही आयते पदरात काही देत नसतो. तुकाराम महाराज म्हणतात आरसा जर मळालेला असेल तर त्यात आपला चेहरा नीट दिसू शकत नाही.त्यासाठी आरशाला नीट उजळावे लागेल.तसं आपलं मन  मळालेला असेल तर त्याला चकाचक केल्याशिवाय स्वतःचे खरे स्वरूप दिसणार नाही.

       या अभंगांमध्ये तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत.मंथन,घर्षण आणि उजळवणे हे ते आहेत.आपण प्रयत्न केले नाही तर कितीही माहिती असली तरी तिचा उपयोग नाही. मंथन केल्यावर लोणी प्राप्त होतं ते फक्त करणाऱ्याला काढता येऊ शकतं.घर्षण केल्याशिवाय अग्नी निर्माण होत नाही. आणि मळकट आरसा साफ केल्याशिवाय चेहरा नीट पाहता येत नाही. या उदाहरणातून संत तुकाराम महाराज यांनी प्रयत्न करणार्‍याला यश मिळतंच याचं समर्थन केलं आहे.जगाचा तो नियमच आहे.संकट आले, अपयश आले तरी पुन्हा पुन्हा जो नेटाने प्रयत्न करतो तो यशस्वी होतो. याचे एक उदाहरण पाहू.

      एक माणूस होता.त्या माणसाला वयाच्या एकविसाव्या वर्षी व्यवसायात तोटा आला. त्याचा व्यवसाय बुडाला. बाविसाव्या वर्षी तो विधिमंडळाची निवडणूक खूप मतांनी हरला. चोविसाव्या वर्षी  पुन्हा एकदा व्यवसायात सपाटून अपयशी ठरला. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी ऐन तारुण्यात त्याची पत्नी वारली. चौतिसाव्या वर्षी तो संसदीय निवडणूक हरला.वयाच्या ४५ व्या वर्षी सिनेटच्या निवडणुकीत पराभूत झाला.वयाच्या ४७ व्या वर्षी त्याचे उपराष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले.त्याला यश मिळाले नाही. एकोणपन्नासाव्या वर्षी आणखी एकदा सिनेटवर निवडून येण्यास अयशस्वी झाला. सारे हितचिंतक,नातेवाईक, मित्र म्हणायचे याचे आता संपले.याचा आता बोऱ्या वाजला.हा जीवनात कधी वर येऊ शकत नाही.तो प्रयत्न करत राहिला आणि वयाच्या बावणाव्या वर्षी तो अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आला.या माणसाचं नाव माहित आहे का ? त्यांचं नाव आहे अब्राहम लिंकन...! यांनी आपली धडपड थांबवली असती तर ? त्यांना राष्ट्राध्यक्ष बनण्यात यश मिळालं असतं का ? उत्तर नाही असेच आहे. 'प्रयत्नांती परमेश्वर' म्हणतात ते उगाच नाही.प्रयत्नांशिवाय,धडपडी शिवाय, मंथनाशिवाय, घर्षणाशिवाय,बुद्धीचा,मनाचा आरसा रोज उकळल्याशिवाय कोणीही यशस्वी होऊ शकत नाही.जीवनात ज्याला यश मिळवायचं आहे त्यानं प्रयत्नांची कास कधी सोडू नये.जीवनात छोट्या-मोठ्या कितीही लढाया हरले तरी चालेल पण शेवटचे युद्ध जिंकणारा नेहमी यशस्वी म्हणून गणला जातो.

-श्रीकृष्ण उबाळे, बीड

 मो.९४०५३४४६४२

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'