माणुसकी
माणुसकी
धर्मासाठी साऱ्या जगभर
होत आहेत युद्ध
निळे आकाश आमचेच
म्हणू शकतात बौद्ध ||1||
उगवता आणि मावळता
सूर्य असतो भगवा
म्हणू शकतात हिंदू
त्यावर आमचा दावा ||2||
पाऊस खाली पडल्यावर
हिरवे होते रान
हरा सारा है हमारा
म्हणू शकतो मुसलमान ||3||
पांढरा असतो प्रकाश
त्यावर अधिकार बिनधोक
म्हणू शकतात की नाही
ख्रिश्चन सारे लोक ||4||
सख्या भावाचं जमत नाही
आणि धर्मासाठी भांडतोय
माणुसकीचं रक्त का ?
यात आम्ही सांडतोय ||5||
धर्मच सर्व असता तर
चीनने तिबेट गिळलं नसतं
धर्मच सर्व असता तर
इराकने इराणला छळलं नसतं
धर्मच सर्व असता तर
गोऱ्यानी कळ्यांना पिळलं नसतं
धर्मच सर्व असता तर
जातपातीचं कुणी पाळलं नसतं ||6||
प्रत्येक ठिकाणी पैसा
हेच तर मूळ आहे
धर्माचा अविवेकी विचार
हे एक खुळ आहे ||7||
कोणताही धर्म माना
कोणत्याही थापा हाना
लठ्ठ लठ्ठ ग्रंथ आणा
माणुसकी जाणा
फक्त माणुसकी जाणा ||8||
श्रीकृष्ण उबाळे,बीड
Comments
Post a Comment