कविता संग्रह

कविता संग्रह

धोकेबाज

दगडाच्या नागोबाला पूजनारा
जिवंत नागाला मारतो
सांगा बरं मानव
असं का करतो ?

हनुमान असतो देव
म्हणत बसतो मंत्र
माकडांना हाकलून देतो
कसलं हे तंत्र ?

उंदराला म्हणतो वाहन
करतो त्याची आरती
विष देऊन मारतो
माणूस असतो स्वार्थी

कुत्रा म्हणे खंडोबा
चोत्रपुरता असतो फक्त
त्याला दगडाने ठेवताना
कुठे जातो भक्त ?

दगडाला नैवेद्य असतो
दगड खेळतो तुपाशी
जिवंत कोटी कोटी देव
झोपतात रोज उपाशी

दगडाला देव मानणारा
माणसात मानतो भेद
जन्मदात्रीचा विटाळ त्याला
वाटत नाही खेद

जिवंत माणसालाही माणूस
म्हणण्याची
माणसालाच वाटते लाज
माणसा रे भोंदू माणसा
तू स्वतःशीच धोकेबाज

(पूर्व प्रसिद्धी दैनिक दिव्य मराठी, माणदेश नगरी)

रक्ताचा रंग

ख्रिचनांच पांढरं
मुसलमानांच हिरवं
बौद्धांच निळ
हिंदूच भगवं अन्
सिखांच पिवळ
खरच असत का रक्त
एकदा पहायचय मला
एक दिवस ख्रिचन
एक दिवस मुसलमान
एक दिवस बौद्ध
एक दिवस हिंदु
एक दिवस सिख व्हायचय मला....!!

त्यावेळी माझे शरीर
वैज्ञानिक चमत्कार होईल
माझ्या रक्ताचे वेगवेगळे रंग
जग डोळे फुत्कारुन पहिल.....!!

ख्रिचन झाल्यावर चर्चमध्ये
मुसलमान झाल्यावर मशिदित
बौद्ध झाल्यावर विहारात
हिंदु झाल्यावर मंदिरात
सिख झाल्यावर गुरुद्वा-यात जाईल
धर्माशिवाय मी मानव आहे
या दृष्टीने कोण माझ्याकडे पाहिल ?

मी मेल्यावर मात्र
होईल मोठी भानगड
मला पुरायच, जाळायच
की दफनायच
यावरून सरेच करतील गडबड
त्यातून दंगाही होईल
मोठा सामाजिक पंगाही होईल
त्यावेळी मात्र
माझे  हृदय फाडा
माझे रक्त बाहेर काढा
रक्ताचा रंग बघा
नेमका आहे कसा
आणि मगच भांडत बसा......!!
   
(पूर्वप्रसिद्ध :- दैनिक मत्सोदरी,जालना)

किती बरं झालं असतं

किती बरं झालं असतं
जर माणूसच पृथ्वीवर नसता
पृथ्वीच्या काळजात नसते
पडले जागोजागी भोकं
तिला सती करायला जंगलरूपी
कुणी भादरलं नसतं डोकं........!!

किती बरं झालं असतं
जर माणूसच पृथ्वीवर नसता
लाखो छोट्या जीवानां
मुक्तपणे वागावेसे वाटले असते
आता ज्यांच जीवन संपत आलय
त्यांना जगावेसे वाटले असते.......!!

किती बरं झालं असतं
जर माणूसच पृथ्वीवर नसता
नसता आला धर्म कोणता
नसत्या आल्या जाती
दंगे पंगे नसते उभे राहिले
दिली नसती कुणी मानवतेला मुठमाती......!!

किती बरं झालं असतं
जर माणूसच पृथ्वीवर नसता
नसतं कसल पूण्य
आणि नसतं कसलं पाप
कुणालाच झाला नसता
मानवी वागणुकीचा ताप...!!

दुष्काळी डोळे

पाणी नाही म्हणून
जळून गेला बाग
शेळीच पार बनलो
झालो होतो वाघ

लेकरावाणी जपलं तुला
पाण्यानं घातलं न्हाऊ
उपाशी पोटी झोपलो
तुला खतांनी घातलं खाऊ

तुझाच ध्यास मला
तुझ्याच साठी झटायचो
तुझ्यात रुपात रोज
विठ्ठल रखुमाईला भेटायचो

माझं भविष्य होतास
मनात मी नाचलो
आज तुझी अवस्था पाहुन
पारच मी खचलो

तुझ्या चिपाडलेल्या देहावर
नजर जेंव्हा टाकतो
तरुण मुलगा मारतो ना
त्या बापासारखा वाकतो

तुझे बुंधे तोडताना
अवस्था काय सांगू आता
मेलेल्या लेकराची जनु
बापच पेटवतोय चिता

सारं सारं पाणी बघ
काळजात आलं दाटुन
डोळेही माझे दुष्काळी
तीथलं पाणीही गेलं आटुन

आई व्हावं लागतं

पोटमधी आईच्या
बाळ मारी लाथा
आई हात फिरवी
एकटी मारी बाता

त्याला वाटतं खाऊ
आईला लागते भूक
किती कसं बोलतं
जरी असतं मूक

कळा,ओझं लेकराचं
सोसत असते आई
तिच्यापेक्षा सोशिक
जगात कोणी नाही

दुःखामध्ये हसायला
बाई व्हावं लागतं
आनंदाने सोसायला
आई व्हावं लागतं

पाकिस्तान रे पाकिस्तान

पाकिस्तान रे पाकिस्तान
तु असला कसला देश
माणुसच आहोत ना आम्ही
इतका का रे द्वेष

तुला लेकरु मानलं
पण निघलास तु साप
असले हल्ले करताना
तुला आठवत नाही का बाप

शांत अहोत आम्ही
घाव घातलास 'उरी'
दहशत तु पोसतोस
किती रे तु माजोरी

इथून तिथून तु
करीत गेलास हल्ले
आम्ही आपले प्रेमाचे
देत होतो सल्ले

तुला वाटतं काय
धर्मात तुझी शान
तुलाच गाडून टाकतील
भारतातले सच्चे मुसलमान

सैनिक आमची प्रेरणा
त्यांना लपुन मारतोस ठार
मनात जर आले ना
तुझे हाल होतील बेकार

भारत म्हणजे तुला
काय आंडु पांडु वाटलाय
बघ ना आपल्या घरात
तुझा देश सारा फाटलाय

नावात तुझ्या पाकडे
नजराणे तुझे वाकडे
आम्हालाही माहित आहे
मारायचे कसे ते खेकडे

येऊन जाऊन देतोस काय
अणुबॉम्बच्या धमक्या
जिरवायची कशी कोणाची
हा दम आमच्यात खमक्या

माणूसकीनं वागु आम्ही
तुम्हीपण माणूसकीनं वागा
नाहीतर.....!
जगाच्या पाठीवर नसेल
पाकिस्तान नावाची जागा..!

(दैनिक माणदेश नगरी)

आमची युती

काल आमच्या म्हशीचं काढायला गेलो दूध
तिनं दिली लाथ मला राहिली नाही सुध

शुद्धीवर आल्यावर लागलो मी रडायला
म्हस बेमान लागली भाषण झोडायला

मी म्हणलं माय हे हाय कशाचं दर्शक?
म्हणे आपल्यात व्यवहार ठेऊ पारदर्शक

मी म्हणलं म्हसे काय बोलती तुझ्या मायला
पेंडीसोबत अल्ता म्हणे 'तरुण भारत' खायला

दूध माझं खाऊन म्हणे का देता मला दंश?
'गो' सोबत माझाही का वाचवला नाही वंश?

तुम्ही माणसं फालतू बंदया कसल्या घालता
नोटबंदीचा परिणाम माझ्या खुराकावर आलता

डबल मला पाहिजे लगेच वाढवून पेंढ
नाहीतर आपल्या युतीचा झालाच बघ एंड

मालक असाला तुम्ही मी हाय फार सनकी
माझी सुद्धा ऐकत जा बात थोडी मानकी

मुंबैसारख दूध तुम्हाला देईन म्हणे वाटून
वाट्यातलं माझ्या मिळणार नाही छाटून

देऊन मनासारखं मी केली तिची स्तुती
दूध दिलं काढून तिने झाली आमची युती

महामानव

राजकारणाच्या दुकानासाठी
महामानव वापरावा लागतो
फायदा करून घेता येईल
तेवढा तो ढोपरावा लागतो

उदोउदोचा खेळ हेच
एकमेव तथ्य असते
विचाराशी देणेघेणे नाही
हे अगदी सत्य असते

संघटना,पक्ष,कार्यक्रमात
महामानव बॅनर असतात
प्रत्यक्षात मात्र खाऊराव
ठिकठिकाणी ओनर असतात

स्वतःचे विचार त्यांच्या नावे
सर्रास विकवले जातात
आपल्या मनातील आंबे
हवे तसे पिकवले जातात

माणसं जमण्या जमवण्याचा
महामानव एक फंडा आहे
फायद्यासाठी चौकटी करण्यात
अनेकांचा हातखंडा आहे

महामानवाच्या जयघोषात
अनेक दंगेही केले जातात
जातीय गुंतागुंतीचे उभे
अनेक पंगेही केले जातात

महामानव निर्मळ नदी असेल
असे वागणारे गटार असतात
सरळ असणाऱ्या विचारांवर
आडवे उभे पठार असतात

दुष्मणाच्या धोक्यापेक्षाही
भोंदूंचाच धोका असतो
नावावर लूट करण्याचा
त्या सर्वांचा मोका असतो

ओळखा कोण कसले आहे?
कोण कुठे फसले आहे?
जयघोष करीत असताना
विचारांचे वांगे वासले आहे

( मा.रसिक)

परीक्षा

परीक्षा खरंच काय असते?
परीक्षा एक नाव आहे
जास्त गुण मिळव्यासाठी
परीक्षा धावाधाव आहे

विद्यार्थ्यांसाठी कमी असते
पालकासाठीच जादा आहे
एवढे गुण मिळायलाच हवे
परीक्षा म्हणजे वादा आहे

परीक्षा कशा कशाची असते
परीक्षा फक्त टक्क्याची आहे
गुणवत्ता वाढीच्या नावाने
कपाळावरील बुक्याची आहे

परीक्षेसाठी गुण असतात
गुणासाठी अक्कल लागते
कुणाकुणाला अकलेसाठी
कॉपी आणि नक्कल लागते

परीक्षा म्हणजे शिक्षण नाही
परीक्षा फक्त तपासणी आहे
तुमच्या झालेल्या आकलनाची
परीक्षा म्हणजे जोपासणी आहे

परीक्षा म्हणजे जीवन नाही
तिच्यासाठी जीव देऊ नका
'गौरव' करा सुंदर 'जीवनाचा'
हलक्या काळजाचे होऊ नका

(मा.जीवन गौरव)

शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे

मोडेन पण वाकणार नाही
कधीच कोठे झुकणार नाही
कोणापाशी हात टेकणार नाही
हे आता बदललं पाहिजे
शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे

शिवबानेही केला होता तह
झेपावण्यास पुढे,दोन पावले मागे
जातोच कि नाही सिंह?
मागं हाटनं कमीपणा नाही
पायात बळ आणलं पाहिजे
शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे

महापुरे झाडे जाती
परी लव्हाळे वाचती
शीर सलामत तो पगडी पचास
हे तत्व ध्यानी घेतलं पाहिजे
शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे

माघार म्हणजे हार नसते
विजयाची खरी धार असते
तयारीचा निर्धार असते
हे सूत्र ध्यानी बसलं पाहिजे
शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे

मोडण्यापेक्षा माघार घ्यावी
विजयाची रचना करावी
निर्धार करावा इतका पक्का
विजयाचा हुकमी एक्का
स्पर्धेत आपण टिकलं पाहिजे
शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे

नसेन तर पैठणी नेसेन 
नाहीतर उघडी बसेन
हे काही ठीक नाही
असल्या विचारांच्या रक्ताचं
नक्कीच आपलं पीक नाही
कधीकधी स्थितीपुढे वाकलं पाहिजे
शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे

काय कामाची सदा ताठरता
वेळेनुसार ठेवावी लवचिकता
लावचिकतेत कमीपणा मानू नये
स्वतःच्या पायावर धोंडा हानु नये
संधी मानून पुढचं युद्ध जिंकलं पाहिजे
शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे

बलात्कार
––––––
मला वासना आजून माहित नाही
माझं वय दोन तीन पाच सात 
किंवा दहा वर्ष
ड्रेसही माझा तंग नव्हता
मग का झाला माझ्यावर बलात्कार.....!

माझी वासना संपली होती
माझं वय साठ सत्तर ऐंशी वर्ष
मीही तंग ड्रेस घातला नव्हता
मी दिसायला अजिबात 'हॉट' नव्हते
मग का झाला माझ्यावर बलात्कार....!

मी तर चक्क पुरुष
माझ वय पाच सात नऊ वर्षाच
मला तर स्रीयांसारखे अवयव नाहीत
मी साऱ्यासारखाच ड्रेस घातला होता
मग का झाला माझ्यावर बलात्कार ?.....!

कसले कायद्याचे राज्य ?
केस दाखल करायला महिने
आरोपींना पकडायला वर्ष
कोर्टात हजर करायला दोन वर्ष
आरोप निश्चितीला तीन वर्ष..!

तोवर ते जामीनावर
पुन्हा एखादीवर आणि
कायद्यावर चढायला...!
पुन्हा हाय सुप्रीम..!

हे सारे होताना 
बलात्काऱ्याच्या बलात्कारापेक्षा
ठिकठिकाणी होत राहतात
नव्या दमाने बलात्कार....!

बलात्कार सडक्या मनामनात आहे
बलात्कार लाडक्या इंटरनेटच्या पनापानात आहे
बलात्कार मोबाईलच्या प्रत्येक क्षणात आहे
बलात्कार जनावरात नाही फक्त माणसात आहे....!

(मा.रसिक)

जिंदाबाद

शहर गाव गल्लीमध्ये
एकच एक चर्चा
पाचशे आणि हजारांचा
कसा करायचा खर्चा ?

निर्णय झाला दणदण
हेच आता जनधन
घराघरातुन निघु लागले
गुपचुप ठेवलेले काळेधन

निर्णय जाहिर होताच
सोनं कसं झळकलं
सोन्याशिवाय पर्याय नाही
पैशावाल्यांनी ओळखलं

साऱ्या प्रश्नाचं जाणु
नोटात दडलय उत्तर
जोतो मरतोय फवारे
मारतोय गोडव्याचे अत्तर

महीनाभर ज्ञान आपलं
करीत बसतील स्पष्ट
मोर्चा नंतर चर्चेला
मिळाली नवी गोष्ट

निर्णयाने काय होईल
अनेकांना लागेल चंदन
प्रधानमंत्री मोदी साहेब
तुमचे मनातुन अभिनंदन

'भांडवल' म्हणून नोट
निवडणुकीत नका वापरु
शेतकरी 'भाव' मिळण्यासाठी
जगोजागी लागलाय कापरु

निर्णयाने जसा दिला
तुम्ही भल्याभल्यांना दणका
भाव वाढवुन मालाचा
ताठ करा शतकऱ्याचा मणका

कृषीप्रधान देशाचे 'प्रधान'
मंत्री तुम्ही आहात
उद्योगाकडे पहाता तसे
शेतीकडे का नाही पाहात ?

शेतकरी विरोधी कायदे
तात्काळ करा बाद
साऱ्या देशाचे शेतकरी
तुमचाच करतील 'जिंदाबाद'...!

अभ्यास

खऱ्या अभ्यासाचा चमत्कार
पहायचाय का तुला ?
गरीबाच्या पोरा कलेक्टर 
व्हायचय का तुला ?

असाध्य ते साध्य
करून अभ्यास
केले रिक्षावाल्याच्या पोराने
चिंता सोड कामाला लाग
असेल तेवढया जोराने

शिक खुप खुप शिक
अभ्यासाचा संघर्ष कर
बाप गरिबीत मरतोय
त्याच्या मनाला हर्ष कर

कलामांना सलाम कर
स्वप्न पहा मोठे
अभ्यास एके अभ्यास
बाकी सारे खोटे

गरीब असतो तोच
जो धरीत नाही ध्यास
अमीर असतो तोच
जो करीत असतो अभ्यास

अभ्यास म्हणजे श्रीमंती
अभ्यास असतो सर्व
अभ्यास घडवतो माणसाला
अभ्यास असतो जीवनपर्व

इवल्या बियात असतं झाड
सुप्तपणे पेरलेलं
दगडातच असतं वेरुळ
नक्षीकाम कोरलेलं

पावसा तु पड रे!

पाणवठे सारे आटले
विहिरी बनल्या केवळ बंकर
गावोगावी युद्ध पाण्याचे
रणगाडे हे बनले टँकर
तुझविन जीवन अवघड रे
पावसा तु पड रे

झाडं वेली जळून गेले
पाने फुले गळुन गेले
शेतकरी सारे हळूहळून गेले
बरेच शहरात पळून गेले
आभाळात होऊ दे गडगड रे
पावसा तु पड रे

दिलास सर्वांना चांगलाच धडा
मिळेना झालाय पाण्याचा घडा
झाडे लावु झाडे जगवु
समतोल सगळा नीट टिकवु
ही नाही नुसती बडबड रे
पवसा तु पड रे

तु आमची माय रे
तु अमचा आहेस बाप
कळाला तु नसण्याचा ताप
संपव सारी दुष्काळी नड रे
पावसा तु पड रे

जीवनाचे कारण तु
जगण्याचे धोरण तु
वसुंधरेचे तोरण तु
बरसु दे तुझी झड रे
पावसा तु पड रे

(दैनिक माणदेश नगरी)

बापू

कशाला देशाच्या फंदात पडलास?
कशाला देशासाठी लढलास?
कशाला सत्य अहिंसेचा मार्ग दिलास?
कशाला लोकांसाठी आत्मक्लेश केलास?

कशाला जनतेवर विश्वास ठेवलास?
कशाला देशासाठी श्वास दिलास?
कशाला म्हणालास 'करा किंवा मरा'?
कशाला झालास शांतिचा झरा?

तुझ्यावर मनातुन श्रद्धा आहे
असा कोणीच भेटत नाही
तुझा विचार तुझ्याच
अनुयायांना पटत नाही

तुझ्या जयंतीला लोक
मोठमोठे भाषण ठोकतात
खासगित बापु तुझ्यावरच
नको ती गरळ ओकतात

तुझ्यामुळे देशाचे नुकसान झाले
असे लोकांचे मत आहे
जयंती पुण्यतिथीला हार
पेपरात जाहिरात
एवढीच तुझी पत आहे

तुझा अहिंसेचा मार्ग इथे
कधीच बाद झालाय
जातीचा,धर्माचा,प्रांताचा
कोराकरकरीत दहशतवाद आलाय

तु म्हणायचास 'खेडयाकडे चला'
आजच्या राजकारणाने बापू
खेडयाचा पार केलाय काला

खेडयाकडे जाणारांची माय
आजुन तरी व्याली नाही
अजूनही खेडयांची 
कसलीच सुधारणा झाली नाही

आजही खेडयात चांगले रस्ते नाहीत
लोक रस्त्यावरच हागतात
प्रश्न काही बदलले नाहीत
आजही लोक भीकच मागतात

रोज इथं जलियनवाला हत्याकांड होतात
कायदा आणि सुव्यवस्थेची मांड होतात

तु म्हणायचास सत्याचा विजय होतो
म्हणून सत्याग्रह करा
रोज आम्ही पहातोय असत्याचा विजय
म्हणून म्हणतात सारे पैशाचा आग्रह धरा

तु दारुबंदीसाठी झटलास
आता तुझे अनुयायी 
दारुचे कारखाने मिळवण्यासाठी
झाटतात
निवडून येण्यासाठी दारूसोबत 
पार्ट्या आणि पैसेही वाटतात

तुझ्या नावाचे अनेक विद्यालय काढले
तुझे अनेक पुतळे उभारले
पण बापू तुझे कोणतेच विचार
कोणीच नाही बघ स्विकारले

तु सुंदर भारताचे स्वप्न पाहिले
पण तुझे हे स्वप्न स्वप्नच राहिले
जयंतीला सगळेच गोडवे गातील
तस्वीरीसमोर तुझ्या लाच खातील

म्हणून म्हणतो बापु
पुन्हा एकदा ये या देशात
पण भारी कडक होऊन ये
मोठा बेधडक होऊन ये
खुप लालभडक होऊन ये
सुस्तीवर धडक होऊन ये
येताना असे साकडे घेऊन ये
की पुन्हा कोणी वाकडे वागणार नाहीत

नाहीतर बापू.....!!
तु स्वतःच म्हणशिल
कुणीच कसं माझ ऐकत नाही
सारेच करताहेत उदोउदो
पण एकही विचार घेत नाही

म्हणून बापू........!!

तुला पहिल्यांदी म्हणालो होतो
तु कशाला देशाच्या फंदात पडलास?
आन् कशाला देशासाठी
लढलास?

(दैनिक माणदेश नगरी)

बळीराजा

तुला पाताळात घालणारे
आजुन तसेच जीवंत आहेत
तुझ्या जीवावर पोसणारे
आजुन तसेच जातीवंत आहेत

तुझे अंश असणारे
आज भिकेला लागत आहेत
जागोजागी अनेक 'वामन'
आजही तसेच वागत आहेत

तुझी आठवण करताना
साजरे करतो वैभव
दुःखातही असते दिवाळी
बहिण म्हणते गोडजेव

तु पाहत असशील
म्हणून करतोत सन
तुझी स्मृती जपताना
तुझ्याएवढं होतं मन

आम्हालाही माहित नाही
जीवनाची केंव्हा खुलेल कळी
इथून तिथून राजा
आजही तुझाच जातो बळी

दिवाळीचा प्रकाश पाहुन
थोडा होतो हर्ष
असं वाटत क्षणासाठी
पृथ्वीवर तुझाच पदस्पर्श

कधीतरी येईल राज्य
दिव्या दिव्याने मिळून
बहिणीचा विश्वास पक्का
ईडा पीडा साऱ्या टळून

(दैनिक माणदेश नगरी)

ओवाळणी

आला आला हो सण
बहिण भावाची दिवाळी
भावाचा समाधानी ढेकर
बहिण भावाला ओवाळी

भावाचा हात खिशात
काढतोय ओवाळणी
बहिन म्हणतीय दादा
दे खिशात ठेऊनी

पैसा नको सोनं नको
नको मला रे साडी
दुसऱ्याच्या बहिनीची तु
कधी काढू नको छेडी

आज घडतय भलतंसलतं
जागोजागी होतात बलात्कार
शब्द दे एवढा पक्का
तु कधी असे नाही करणार

तुझ्या शब्दाने मी
सुरक्षित होईल येथे
धावतील अनेक भाऊ
मी जाईल जिथे जिथे

कुणाच्याच अयुष्याचा
होणार नाही खेळ
'मोर्चा' काढण्याची मग
येणार नाही वेळ

शोभशिल रे दादा
तु माझा भाऊराय
सारे म्हणतील तुला
सखा आमचा शिवराय

आता मी लढणारय

कन्हत कुढत जगनं हे
आता मी सोडणारय
शेतकऱ्याचा पुत्र मी
आता मी लढणारय

मी हाई रे सर्वांचा
माझ्यासाठी नाही कोणी
मी दूध जरी काढीतो
दुसरेच खाती लोणी
माझ्यासाठी मीच
नवा मार्ग जोडणाराय

जो तो आपलं बघतो
करुण घेतो फायदा
शेतकऱ्याच्या मुळावर
आज बसला कायदा
आरे एक होऊन आता
मी कायदा मोडणारय

आपल्या देशात चहावाला
होतोय पंतप्रधान
आपल्या देशाला पोसणारा
त्याला येतय मारान
आता येईन जो आडवा
त्याला मी झोडणारय

कधी दुष्काळ धरीतो
कधी पाऊस मरीतो
त्यातून काहिबाही पिकलं
भाव धुळच चारीतो
सांगु का तुम्हाला मी
आता वेगळी वाट धरणारय

एक एक होऊन ठिणगी
मी लाऊन देईन आगी
दिसन त्यावर ठोका
सुस्ती करीन जागी
हातात क्रांतीची आग
आता माझ्या पेटणारय

माझ्या रक्ताला घामाला
योग्य मिळावा भाव
अधिग्रहण कायदे आता
मागे तुम्ही घ्याव
माझा गावरान इंगा
आता तुम्हाला दावणारय

जिजाऊ

जसं वारं काव्हदान
माता आमची जिजाऊ
नव्हती कशाला भित
भयान होती लढाऊ

कसा शिवबा जडला
तिच्या कुशीत वाढला
तो संस्काराचा मुकुट
तिच्या मुशीत घडला

कसे स्वातंत्र्याचे गीत
तिने कानात फुंकले
स्वराज्य मोती माणीक
शिवबा मनी गुंफले

झाली जिजाऊ कधीच
साऱ्या जगाची माऊली
नभ भरून ठेवली
तिने विचार सावली

होती शहाजिंची साथ
प्रकाश वात पेटली
स्वराज्याच्या कार्यासाठी
सारे आयुष्य आटली

तुझ्या चरणी जातो गं
आपसुक माझा माथा
प्रेरणेने गातो तुझी
अभिमानाने गं गाथा

ऊसतोडी

सारे जग रे थंडीत
आराम असतो नर्मीत
तव्हा तोडीतो रे ऊस
कामा घामाच्या गर्मीत

बाय माझी लेकुरवाळी
असे कामासाठी ताठ
पाचराड मऊमऊ गादी
माझ्या लेकराचा थाट

करतो मी रे कारखाना
ऊसतोडीचा हा धंदा
इचुकाटा मानीत नाही
हातपाय माझा बंदा 

बैल आणि ऊसगाडी
बनली माझी रे जोडी
हाती घेवून कोयता
करतो पोटासाठी तोडी

होतं खुप जव्हा कष्ट
अन्न लागे तव्हा मिष्ट
हाती येतो जव्हा फोड
साखर लागे तव्हा गोड

नदी

देव टाका धर्म टाका
सारे घाण कर्म टाका
स्वच्छतेचे मर्म टाका
वाहते जसा पाट आहे
तरीही नदी ताठ आहे

शहर गावाचे मलमूत्र टाका
मेलेलं जनावर कुत्र टाका
रोगीट जाळून पुत्र टाका
जर्जर तिचा घाट आहे
तरीही नदी ताठ आहे

अंघोळ करून पवित्र व्हा
गटार सोडून विचित्र व्हा
गंगेची गटारगंगा चित्र का?
लावली तिची वाट आहे
तरीही नदी ताठ आहे

नदी वाहते आहे
जीवन गाते आहे
धक्के खाते आहे
पवित्र होते आहे

नदी आज रडते आहे
नदी काही सांगते आहे
थोडी थोडी 'मानवी वागणूक'
घाटावर आणून टांगते आहे...!!

एकच इच्छा

वाळलेलं खंगलेलं
उभ आहे एक झाड
ज्वानीमध्ये आसरा दिला
कित्येकाचे केले लाड

आज कोणी जात नाही
त्याची येत नाही दया
दातृत्व संपले त्याचे
संपली जवळची माया

पोरंसोरं खेळायचे
द्यायचे दगड मारुन
झाडही सारं द्यायचं
टाकायचं सार चारुण

उन्हाळ्यात विचारू नका
द्यायचं थंडी सावली
साऱ्या साऱ्या जिवांना
वाटायची आपली माऊली

आता झाड पोरके आहे
गेलाय त्याचा जीव
उपयोग नाही आपला
त्याला याचीच येते कीव

होतं नव्हतं दिलं सारं
आता राहिल्या काडया
कापून म्हणे लोकहो
उभारा तुमच्या माडया

शेवटी माझा देह आहे
कुजत ठेवायचे टाळा
एकच इच्छा माझी आता
इंधन म्हणून जाळा....!

पोट

जीवन म्हणजे पोट
पोट एक कला
कुणासाठी जगणे तर
कुणासाठी बला

कमावणे तरी काय असते
जगण्यासाठीची धडपड
प्रत्येकासाठी असते फक्त
वाचण्यासाठीची फडफड

पोटासाठी इथे रोज
काय काय करावे लागते
कुणाचे भरत असते पोट
कुणाला मात्र मरावे लागते

कुणी मांसाहार म्हणेल
कुणी शाकाहाराच्या थापा हाणेल
जीव वांग्या कोंबडीतही असतो
तरीही त्याला कापा म्हणेल

स्वतःला वाचवण्यासाठी
प्रत्येक जीव दक्ष असतो
छोटयांचे जातात जीव
तो मोठयांचा भक्ष असतो

स्वतःला जगण्यासाठी
दुसऱ्याचे घेतात घोट
तोपर्यंत असेच घडेल
जोपर्यंत असेल 'पोट'

आनंदाने डुलायचय

शिक्षण घ्यायचय मला
कष्टातुन नाही सूट
उठतेय मी स्वभीमानाने
आता आवळलीय मुठ

ध्यास फक्त शिक्षणाचा
शिक्षण माझे गीत
कष्टाचे म्हणाल तर
ते तर माझे संगीत

मी आहे गरीब छोटी
माझी झेप अफाट
मीच माझा मार्ग
मीच आहे माझी वाट

तो दिवस दूर नाही
मिळेल मला फळ
कष्टाचे असेल माझ्यात
ठासुन भरलेले बळ

खडकातच असते पाणी
ते मला खोदायचय
चिखलातच असते कमळ
ते मला शोधायचय

पाण्यासारखे जीवन
कमळासारखे खुलायचेय
कष्टाचे चीज करून
मला आनंदात डुलायचय

दोन जीव

दोन पीकलेले जीव
चालत होते वाटाने
काढल घरा बाहेर
पोर नावाच्या भाटाने

दोन अनाथ ते जीव
चालत होते आधाराने
नाही कोणाची सावली
चालले फाटक्या पदराने

दोन खंगलेले जीव
त्यांना कोणी नाही वाली
चिपाडलेल्या जीवावर
आज काय वेळ आली

दोन लंगडे पांगळे
त्यांची कुठे गेली काठी
ज्यांनी करावा संभाळ
ते मारु लागले पाठी

एक धरणी आकाश
आज अनाथ अनाथ
ज्याला नाही दयामाया
असे जा रे मसनात..!

शिवबा नेमका होता कसा?

पुरे झाले आता मोठेपण
पुरा झाला पोकळवसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?

शिवबा म्हणजे केवळ लढाया नाही
शिवबा म्हणजे केवळ बढाया नाही
आपल्या मनातील पदार्थ तळणाऱ्या
शिवबा म्हणजे केवळ कढाया नाही
शवबासारखे वागून तुम्ही
पुन्हा निवांत भांडत बसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?

शिवबा चांगल्याची कदर आहे
शिवबा स्रियांचा आदर आहे
शिवबा केवळ राजा नाही
शिवबा मानवतेचा फादर आहे
त्यांची थोडी स्फूर्ती घेऊन
विजयी राजमुद्रेने हसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?

शिवबा केवळ गड किल्ला नाही
शिवबा केवळ हल्ला नाही
शिवबाच्या नावाने चंदा करायला
शिवबा काही गल्ला नाही
शिवबाचा गुण जगताना
जीवनात एकदातरी दिसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?

शिवबा सुरुवातीचा तोरणा आहे
शिवबा करणाऱ्यांची प्रेरणा आहे
शिवबा म्हणजे महाराष्ट्राच्या
कणाकणात भरलेली धारणा आहे
खरखर सांगा त्यांचा
किती जणांनी घेतला वसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?

शिवबा म्हणजे पुतळा नाही
शिवबा म्हणजे कोथळा नाही
शिवबाला चौकटी करायला
शिवबा एवढा उथळा नाही
त्यांचा जयजयकार करणारा
शुद्ध पाहिजे हरएक घसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?

शिवबा कुणाच्या जातीचा नाही
शिवबा धर्माच्या वातीचा नाही
त्याचा झेंडा मिरवताना समजून घ्या
शिवबा फक्त इथल्या मातीचा नाही
शिवबाच्या तेजस्वी विचारांचा
जगभर उमठलाय ठसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?

कोण होते शिवाजीराजे?

शिवाजीराजे ऐतोबा नव्हते
शिवाजीराजे निर्मिक होते
शिवाजीराजे धर्मभोळे नव्हते
शिवाजीराजे धार्मिक होते

शिवाजीराजे क्रूर नव्हते
शिवाजीराजे साहसी होते
शिवाजीराजे आततायी नव्हते
शिवाजीराजे ध्यासी होते

शिवाजीराजे फक्त स्वप्नाळू  नव्हते
शिवाजीराजे स्वप्नांच्या नादी होते
आपले स्वप्न वास्तवात उतरवणारे
शिवाजीराजे वास्तववादी होते

शिवाजीराजे व्यसनी नव्हते
शिवाजीराजे व्यासंगी होते
मानवतेला प्रेरणा देणारे
मानवतेचे गुण त्यांच्या अंगी होते

शिवाजीराजे संस्काराची भाषा होते
शिवाजीराजे जिजाऊचा शब्द होते
शिवजीराजेंचे सारे सारे जग
जिजाईच्या शब्दपुढे स्थब्द होते

त्यावेळी

जगण्याच्या वस्तु विक्रीला
धुळीत रस्त्यावर गटाराजवळ
नाल्यावर उघड्यावर हातगाडयावर
त्याही अगदी 'मुक्कामार' भावाने

जगण्यास सहाय्यक वस्तु विक्रीला
शॉपीमध्ये दुकानात झाकलेल्या
अगदी स्वच्छ
त्याही अगदी 'शिक्कामार' भावाने

हौसेच्या मौजमजेच्या व इतर वस्तु विक्रीला
मॉलमध्ये शोरूममध्ये चकचकीत
काही एसीमध्ये
त्याही आगदी 'थुक्कामार' भावाने

ज्या शिवाय जगुच शकत नाही
त्याला आहे का किंमत...!
इतर वस्तुंचा 'भाव' करण्याची
आहे का कुणात हिंमत....!

भाजीपाला महागला ओरडा
कांदा अनेक वेळा रडवत असतो
हरएक माणूस 'भावाच्या' नावाने
आपला ऊर फुटुुसतोर बडवत असतो...!

ज्या दिवशी जगण्याच्या वस्तु
मॉल शोरूममध्ये एसीत येतील
ज्या दिवशी इतर वस्तुंचा लोक 'भाव' करतील

त्या दिवशी ....त्याच दिवशी
टाटा अंबानी अदाणी बिर्ला
आणखी सगळे
आपल्या वस्तु हातगाडयावर टाकतील
आणि
'कार घ्या कार'
'मोबाईल घ्या मोबाईल'
'सिमेंट घ्या सिमेंट'
असे ओरडताना शहराशहरात...
गल्लीगल्लीत...गावागावात दिसतील....!!

कापूस

कसे बियाणे बियाणे
केले बेजार तयाने
उधार उसने पासने
किती सांगु मी बयाणे

केली रानी मशागत
असे पावसी करामात
घाली काळजाचे पाणी
विसरून सारी फसगत

भरून उगवले रोप
मला येइना रे झोप
करी त्याची देखभाल
स्वप्नासाठी खाटाटोप

पीक आले रे भरात
भरलं माझ्या रे उरात
करतो सोन्याची वेचनी
आणलं जपुन घरात

आल भरून हे पीक
आता होईल सारं ठिक
नाही पसरणार पदर
नाही मागणार भीक

असा ऐकून तो भाव
आली माझी मला कीव
माझ्या रक्ताच्या घामाचा
का रे घेता त्याचा जीव

आरे कापुस कापुस
नको मला तु कापुस
वाटे होईल सारे गोड
होईल जीवन हापूस

होतो मनात नाचलो
पार आता मी खचलो
व्यवस्थेत साऱ्या कसा
अलगद जाळ्यात फसलो

नाही मानणार हार
जरी कष्ट झाले फार
आता लाढून भिडून
चिरीन सारे आरपार

कर्मयोगी गाडगे बाबा यांच्यावर
केलेली कविता....!!

बाबा

शिकलेले नव्हतात
पण होतात डोळस
शिकलेल्या लोकांची
येते आज किळस

घाणी सोबत आपण
साफ केलेत डोके
आज डोके कसे
बनले पोकळ खोके

तुम्ही तुकोबांचा
शब्द केलात खरा
झालात रंजल्यांचा
जीवंत निर्मळ झरा

तुमचा देव होता
जीवंत आशा जीवात
आज आम्ही शोधतोय
देव दगडांच्या पेवात

तुमचा होता हात
डॉक्टर अन भाऊरावांवर
आजच्या साधुंचा हात
असतो फक्त खाऊरावांवर

बाबा आजचा धर्म
माणसांना मारतोय
सत्याशी असते अंतर
असत्य स्विकारतोय

आज सारे उलटे
नुसती दिसते गर्दी
माणसांना नाकारण्याची
जिकडे तिकडे वर्दी

तुमचा प्रकाश देणाऱ्या
काही पणत्या आहेत पेटत
त्या कधी विझतील
असे कधीच नाही वाटत

शिक्षण गोधडी

शिक्षण आता शिक्षण नाही
झाला प्रयोगाचा कारखाणा
कधी काय काय येतय नवं
प्रगतीच्या नाही खानाखुणा

शाळा सुरु झाली की
गप वाटा ड्रेस पुस्तक
एमडीएम अन् टपालात
घुसतं शिक्षकाचं मस्तक

शाळेच्या कणा साऱ्या
जीने झाला वाकडा
असली कसली 'सरळ'
बनली गुणवत्तेचा खेकडा

ऑनलाईनचा आजतरी
खरच आलाय विट
शिकवायचे सोडून सारे
शिक्षक झालेत कीट

विद्यार्थ्यासोबत आता
सेल्फी धाडणार काढून
कळत नाही शिक्षणात
ठेवलय काय वाढुन ?

कसा होईल सांगा
राज्य शैक्षणिक प्रगत
कशा कशाची रचना
तुम्हीच बसा सांगत

गुणवत्तेचा फुगा त्यात
ऑनलाईनची हवा
त्यात आता तुम्हीच
नव्या पीना खोवा

तांदूळ निवडूण निवडूण
शिक्षक झाला खिचडी
चिंध्या चिवडून चिवडून
शिक्षण झालं गोधडी...!

अनाथ जीवांचा नाथ होऊ

ज्याला कुणाची ममता नाही
त्याची आपण माय होऊ
पोरक्या झालेल्या वासरांची
चला आपण गाय होऊ

ज्याच्या मुखी अन्न नाही
त्या मुखातील भात होऊ
ज्याला कुणाला बाप नाही
मुखी भरवणारा तात होऊ

पोरका कुणी कान्हा असेल
त्याच्यासाठी पान्हा होऊ
माणूस जर असु आपण
माय बाप पुन्हा होऊ

ज्यांचे ओठ कोरडे असतील
त्यांची ओलसर बात होऊ
जीवाला जीव समजणारी
माणसाची जात होऊ 

ज्यांनी आवाज ऐकला नाही
त्यांच्यासाठी डफडे होऊ
जे जे दिसतील उघडे सदा
त्यांच्यासाठी कपडे होऊ

ज्यांना जगात कोणी नाही
त्यांच्यासाठी मदत होऊ
ज्यांच्या पाठीवर हात नाही
त्यांचा आपण हात होऊ

ज्या दिव्यात वात नाही
त्या दिव्याची वात होऊ
ज्या दिव्याची ज्योत विझली
त्या दिव्याची ज्योत होऊ
अनाथ जीवांचा नाथ होऊ

जत्रा

भरली मोठी जत्रा
दुकाणं सोळा सतरा
सामान आपले मांडले
अनेकजन भांडले

एकाचे हाताचे चित्र
अनेक त्याचे मित्र
एकाने आणले फूल
भल्यांची दांडी गुल

एकाचा आला हत्ती
ओरडत होता कित्ती
आणली एकाने सायकल
ग्राहक फक्त मायकल

कोणी आणली गहु कुडी
कोणी विकत होता घडी
कुणी होता पानवाला
कुणी धनुष्य बाणवाला

बाकी चिल्लर होते खुप
कुणी ओरडे कुणी चुप
कपडे पांढरे दिसती बम
लोकांनाच द्यायचे दम

आतुन एकिचा धंदा
गोळा करायचे चंदा
खोटे खोटे भंडायचे
नाटक सारंं मांडायचे

शिवबा

शिवबा तुझ्या राज्यामध्ये
तुझ्यावरून वाद आहे
कोण स्विकारी विचारांना
श्रेयामध्येच स्वाद आहे

जन्म तुझा झाला कधी
यावरून खल आहे
सांगती जे मार्ग तुझा
त्यांची डोळ्यात सल आहे

खोटेपणा पेरण्यात
भामटयांची भर आहे
तुझ्या विचारांची शिवबा
चौकाचौकात टर आहे

उदोउदोसाठीच शिवबा
तुझा होतो वापर आहे
कसे पिणार विचारांना
फुटके हाती खापर आहे

अशिर्वादासाठी तुझ्या
इथे लागली स्पर्धा आहे
जो तो सांगे मोठेपणा
वागणुकीत अर्धा आहे

कोणी म्हणे भगवा आहे
विरोधक हिरवा आहे
मानवतेच्या लाढाईची
येथे कुणास पर्वा आहे

आरमाराच्या जनका
समुद्रात तुझा थाट आहे
पाण्यात पाही दुस-यांना
कधी कात्रजचा घाट आहे

तुझ्या विचारांची ज्वाळा
मनामनात जळत आहे
कोण झटतो कशासाठी
प्रत्येकाला कळत आहे

मनामनात तुझे आमच्या
भव्यदिव्य स्मारक आहे
तेच स्वप्न करील पूर्ण
तेच आम्हा प्रेरक आहे

कनाकनात राष्ट्राच्या
तुझी भव्य मूर्ती आहे
मनामनात कणाकणात
तुझी दिव्य स्फूर्ती आहे

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'