संत तुकाराम यांच्या अभंगातील वात्रटिका भाग -6 "नावाने आलेला मोठेपणा पोकळ असतो"

संत तुकाराम यांच्या अभंगातील वात्रटिका भाग -6

"नावाने आलेला मोठेपणा पोकळ असतो"

सावित्रीचे विटंबण
रांडपण करीतसे
काय जाळावे ते नाव
अवघे वाव असे ते

कुबेर नाव मोळी वाहे
कैसे पाहे फजिती
तुका म्हणे ठुणठुण देखे
उगी मूर्ख फुंदता

        नावात काय आहे? नावाचा मोठेपणा किती पोकळ असतो या संबंधी संत तुकाराम यांचा हा अभंग म्हणजे साक्षात वात्रटिकाच भासते. सावित्री नाव असलेली स्त्री जर व्येश्याव्यवसाय करीत असेल तर तिचे वर्तन सावित्री नावाची विटंबना करणारे आहे. असे नाव मोठे असून काय कामाचे, नावातील मोठेपणा कुणाचे नाव ठेवल्याने येऊ शकत नाही.म्हणून नावापेक्षा वर्तन महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीचे नाव कुबेर असेल आणि तो मोळी वाहण्याचे काम करीत असेल तर किती मोठी विसंगती आहे? याला गम्मत म्हणावे, हसावे कि रडावे? किती आणि कसली हि फजिती म्हणावी. मूर्ख लोकांनो दांभिकपणाने का बरे फुंदत आहात? नावाचा पोकळवासा किती दिवस मिरवणार आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. याविषयी संत कबीर यांचाही एक दोहा आहे त्याचा मराठी अर्थ...'भिकाजी नावाचा मनुष्य लखपती असतो तर लक्ष्मी नावाची बाई फाटकी असते भिकारी असते.'
नावातील किती मोठा विनोद म्हणावा लागेल हा?

      कावळ्यांनी हंसाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला म्हणून तो हंस होत नाही किंवा कुणाचे नाव धारण केले म्हणून त्या नावाच्या महान व्यक्तीचे गुण कुणात येऊ शकत नाहीत . त्याच न्यायाने ढोंगी लोक बाह्य दिसण्यावरून महात्मा,संत,साधू होऊ शकत नाहीत.असा नावाचा पोकळ वेश परिधान करणे म्हणजे नकट्याने मोती धारण करण्यासारखे आहे अशा लोकांची काही काळाने खूप बेजारी,फजिती होत असते. अशा पोकळ,ढोंगी लोकांनी फुंदु नये म्हणजेच असे नाटक करू नये असे त्यांना सुचवायचे आहे.कलयुगात, आजच्या काळी स्वतःला संत म्हणणारे लोक सर्व प्रकारचे व्यसन करून,व्यभिचार करून मोठा आव आणतात म्हणून ते संत होत नाहीत.
कोणी गांजा फुकत आहे,कुणी भांग पीत आहे,कुणी दारू पीत आहे, कुणी स्त्रीयांचा उपभोग घेत आहे असे लोक
म्हणजे नावाने ,कपड्याने मोठे पण सावित्री नावाच्या वैश्येप्रमाणे आहेत.

     काही रचना केल्या म्हणून कोणी संत होत नाही,किंवा त्या संतांचा नातेवाईक,भावकीतला आहे म्हणून,वंशातील आहे म्हणून त्याच नावाचा,आडनावाचा आहे म्हणून कोणी संत किंवा महान होत नाही. संत तुकाराम महाराज यांची ही टीका अध्यात्म तसेच सामान्य जनतेलाही लागू होते.

       आज या बाबीच जर विचार सामाजिक दृष्टीने केला तर वस्तुस्थिती अगदी अभंगाप्रमाणे आहे. अनेकजण केवळ एखाद्या महापुरुषांचे नाव आपल्या मुलांना ठेवतात पण तसे वागत नाहीत मग कुणा महापुरुषांचे नाव ठेवले आणि चुकीचे कर्म केले तर त्या नावाचा अपमान आहे. आज नावापुढे राजे,राणा,पाटील,देशमुख,
राव अजून काय काय बिरुदावल्या लावतात आणि कितीही लावली तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे काहीच नसते तसेच ते नावाप्रमाणे वागताना दिसत नाहीत मग या गोष्टी हास्यास्पद नाहीत का? म्हणून कोणी नावाने तसा बनू शकत नाही नाव महत्वाचे नाही तर वर्तन महत्वाचे आहे. आणि जे ढोंगी, दांभिक,धोकेबाज असे करीत असतील त्याना तुकाराम मूर्ख म्हणतात.या अभंगात दांभिकतेवर प्रहार,हास्यनिर्मिती हि वात्रटिकेची वैशिष्ट्ये ठळकपणे दिसून येतात.

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,चऱ्हाटा बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'