बापू
कवी,वात्रटिकाकार श्रीकृष्ण उबाळे यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त केलेली खास कविता......!!
*बापू*
---------
कशाला देशाच्या फंदात पडलास?
कशाला देशासाठी लढलास?
कशाला सत्य अहिंसेचा मार्ग
दिलास?
कशाला लोकांसाठी आत्मक्लेश
केलास?
कशाला जनतेवर विश्वास
ठेवलास?
कशाला देशासाठी श्वास
दिलास?
कशाला म्हणालास
'करा किंवा मरा'?
कशाला झालास
शांतिचा झरा?
तुझ्यावर मनातुन श्रद्धा आहे
असा कोणीच भेटत नाही
तुझा विचार तुझ्याच
अनुयायांना पटत नाही
तुझ्या जयंतीला लोक
मोठमोठे भाषण ठोकतात
खासगित बापु तुझ्यावरच
नको ती गरळ ओकतात
तुझ्यामुळे देशाचे नुकसान
झाले
असे लोकांचे मत आहे
जयंती पुण्यतिथीला हार
पेपरात जाहिरात
एवढीच तुझी पत आहे
तुझा अहिंसेचा मार्ग इथे
कधीच बाद झालाय
जातीचा,धर्माचा,प्रांताचा
कोराकरकरीत दहशतवाद
आलाय
तु म्हणायचास 'खेडयाकडे चला'
आजच्या राजकारणाने बापू
खेडयाचा पार केलाय काला
खेडयाकडे जाणारांची माय
आजुन तरी व्याली नाही
अजूनही खेडयांची
कसलीच सुधारणा झाली नाही
आजही खेडयात चांगले
रस्ते नाहीत
लोक रस्त्यावरच हागतात
प्रश्न काही बदलले नाहीत
आजही लोक भीकच मागतात
रोज इथं जलियनवाला
हत्याकांड होतात
कायदा आणि सुव्यवस्थेची
मांड होतात
तु म्हणायचास सत्याचा
विजय होतो
म्हणून सत्याग्रह करा
रोज आम्ही पहातोय
असत्याचा विजय
म्हणून म्हणतात सारे
पैशाचा आग्रह धरा
तु दारुबंदीसाठी झटलास
आता तुझे अनुयायी
दारुचे कारखाने मिळवण्यासाठी
झाटतात
निवडून येण्यासाठी दारूसोबत
पार्ट्या आणि पैसेही वाटतात
तुझ्या नावाचे अनेक विद्यालय
काढले
तुझे अनेक पुतळे उभारले
पण बापू तुझे कोणतेच विचार
कोणीच नाही बघ स्विकारले
तु सुंदर भारताचे स्वप्न पाहिले
पण तुझे हे स्वप्न स्वप्नच राहिले
जयंतीला सगळेच गोडवे गातील
तस्वीरीसमोर तुझ्या लाच खातील
म्हणून म्हणतो बापु
पुन्हा एकदा ये या देशात
पण भारी कडक होऊन ये
मोठा बेधडक होऊन ये
खुप लालभडक होऊन ये
सुस्तीवर धडक होऊन ये
येताना असे साकडे घेऊन ये
की पुन्हा कोणी वाकडे
वागणार नाहीत
नाहीतर बापू.....!!
तु स्वतःच म्हणशिल
कुणीच कसं माझ ऐकत नाही
सारेच करताहेत उदोउदो
पण एकही विचार घेत नाही
म्हणून बापू........!!
तुला पहिल्यांदी म्हणालो होतो
तु कशाला देशाच्या फंदात
पडलास?
आन् कशाला देशासाठी
लढलास?
✍श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment