धोकेबाज या कवितेचे रसग्रहण

*"धोकेबाज" या मा.श्रीकृष्णजी उबाळे यांच्या कवितेचे सौ.आशा पाटील यांनी केलेले रसग्रहण*

*धोकेबाज*

दगडाच्या नागोबाला पुजणारा
जीवंत नागाला मारतो
सांगा बरं मानव
असे का करतो?..||1||

हनुमान असतो देव
म्हणत बसतो मंत्र
माकडांना हकलुन देतो
कसलं हे तंत्र?...||2||

उंदराला म्हणतो वाहन
करतो त्याची आरती
विष देऊन मरतो
माणूस असतो स्वार्थी...||3||

कुत्रा म्हणे खंडोबा
चित्रापुरता असतो फक्त
त्याला दगडाने ठेचताना
कुठे जातो भक्त?..||4||

दगडाला नैवेद्य असतो
दगड खेळतो तुपाशी
जीवंत कोटी कोटी देव
झोपतात रोज उपाशी...||5||

दगडाला देव मानणारा
माणसात मनतो भेद
जन्मदात्रीचा विटाळ त्याला
वाटत नाही खेद....||6||

जीवंत माणसालाही माणूस म्हणन्याची
मणसालाच वाटतेय लाज
माणसा रे भोंदु माणसा
तु स्वतःशीच धोकेबाज...||7||

        श्रीकृष्ण उबाळे,बीड
         मो.9405344642

   समाजात श्रद्धावंत,बुद्धिवंत यांची कमी नाही. भावनांना व भावनांशी खेळ खेळणारे हि तितकेच भेटतात. समाजातील रूढी,परंपरा,प्रथा तयार करणारे,पाळणारे त्याच्यासाठी जगणारे मरणारे भरपूर आहेत. श्रद्धा,अंधश्रद्धेच्या हिंदोळ्यावर हिंदोळे घेऊ इच्छिणारेही तितकेच आहेत. मात्र त्यांच्या कृतीत व बोलण्या वागण्यात बरेच अंतर जाणवते. समाजात खोटे मुखवटे घालून वावरणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आढळतात. या व्यक्तींचे समाजात वागण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. अशाच काही प्रकारांचे दर्शन आपल्याला प्रस्तुत कवितेत होते.
      मा.श्रीकृष्णजीं उबाळे आपल्या धोकेबाज या कवितेत मानवाच्या वेगवेगळ्या स्वभावाचे दर्शन जगापुढे प्रस्तुत करतात. दुनियेचा खेळ निराळाच आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो पण जगाला एखाद्या गोष्टीकडे सकारात्मक पहा सांगणाऱ्याने स्वतः त्याविषयी नकारात्मक वागणे कितपत योग्य आहे. बोलणे आणि कृती करणे यातला फरक योग्य नाही.खरंच लोक असे का वागतात.असा प्रश्न कवीला या कवितेत पडलेला आहे.
       भारतीय संस्कृतीत बऱ्याच प्रथा परंपरा यांची जपवणूक करण्यामागे मानव पशु,पक्षी यांच्याविषयी आदरभाव जागृत करणे. समाजात वावरताना एकमेकांना सहकार्य करणे असे उद्देश आहेत. त्यामुळे आपल्याकडील सणांचे महत्व सर्वानाच खूप वाटते.
नागपंचीमीला भारतीय स्रिया नागाला आपला भाऊ म्हणून पूजतात. त्यासाठी त्या वारुळाला जातात त्याची श्रद्धेने मनोभावे पूजा करतात. प्रार्थना करून आपल्या भावासाठी सुख,आरोग्य दिर्घायुष्य मागतात.
नागपंचीमी या सनाविषयी प्राचीन काळापासून बऱ्याच दंतकथा प्रचलित आहेत.एकीकडे तुम्ही दूध,लाह्या यांचा नैवद्य दाखवून पूजा करणार आणि दुसरीकडे तोच नागोबा घरात निघाल्यावर घाबरून सारक्षणार्थ त्याला मारणार हि कुठली पद्धत.समाजातील प्रत्येकाला आत्मपरिक्षणाची गरज आहे.माणूस स्वार्थी विचार करून असं का बरं वागतो असे कोडे कवीला पडले आहे.
      एकीकडे हनुमानाची पवनसुत,अंजणीपुत्र, रामप्रिय असे म्हणून पूजा केली जाते.मात्र त्यांच्याच वंशज असणाऱ्या माकडांना माणूस हाकलून देतो.हे मानवाचे आगळे तंत्र कळताच नाही.संकटमोचन हनुमानाची भक्तिभावाने पूजा करतो,हनुमान चालीसा म्हणतो.समाजात अशी परंपरा आहे की जन्मापासून लग्नापर्यंत मूल हे हनुमान भक्त बनवून ब्राम्हचार्याचं पालन करतात. लग्नापूर्वी हनुमानाची मंदिरात जाऊन जणू मी ब्रम्हचर्य सोडत आहे हे सांगतात. पण एवढं सगळं जरी असलं तरी माकडांना मात्र आपण घाबरून हाकलून देतो. हे मानवाचं तंत्र कवीच्या लक्षात न येण्यासारखं आहे असे कवी म्हणतो.
     कोणत्याची सत्कारण्याची सुरुवात करताना गणपतीची पूजा केली जाते. श्रीगणेश पूजनाने केलेले कार्य सिद्धीला जाते असे मानले जाते. गणपती सोबत त्याचे वाहन उंदीर याची देखील आपण पूजा करतो. गणपती मंदिराच्या बाहेर मोठा उंदीर दगडाची मूर्ती असते. त्याच्या कानात इच्छा बोलली कि ती पूर्ण होते असे मानले जाते.पण दुसरीकडे घरात,शेतात उंदरांचा त्रास होतो म्हणून त्यांना विष देऊन आपण मारतो. हि कुठली पद्धत ?माणसांचे स्वार्थी धोरण देवालाही न समजण्यासारखे आहे.
      पृथ्वीतलवार 33 कोटी देवांची संकल्पना रुजविणारा मानवच आहे. मग तो पशु,पक्षी,जलचर,उभयचर,मानव अशा कोणत्या ना कोणत्या रूपाची पूजा करतो. कधी सापाला दूध पाजतो तर कधी उंदराला मोदक खाऊ घालतो.
चित्रातील कुत्र्याला खंडोबा मानून त्याची पूजा करतो.
प्रत्यक्षात मात्र काही कारण नसतानाही त्याने काहो त्रास दिला नसतानाही कुतत्रयाला आपण ठेचायला मागेपुढे पाहत नाही. कोणताही पशु पक्षी तुम्ही त्याला त्रास दिला नाही तर तोही त्रास देत नाही पण जर तुम्ही त्याला त्रास दिला तर तो स्वसंरक्षणासाठी नाग फणा काढतो ,चावतो कुत्रा असेल तर भुंकतो.मानवला मात्र काही चुकीच्या सवयी असतात. शांत निजलेल्या कुत्र्याला दगड मारणे किंवा त्याच्या शेपटला फटाका लावून फोडणे इ. आणि जेंव्हा त्या मुक्या जीवाला त्रास होतो तेंव्हा असुरी आनंदाने हसायचे हे कितपत योग्य आहे.
       दगडाला देव मानणारे आणि दगडात देव शोधणारांची संख्या खूप मोठी आहे. माणसाला माणूस आणि माणुसकी याकडे आपण हेतुपुरस्कार दुर्लक्ष करतो.दगडाच्या देवाला आपण तुपाने तर कधी तेलाने स्नान घालतो.मध,साखर,केळ, दूध,दही याने अभिषेक करतो. त्या मूर्तीला छान सुग्रास नैवेद्य दाखवला जातो.
मनोभावे पूजा,प्रार्थना करून स्वहितकारक गोष्टींची मागणी केली जाते. दुसरीकडे मात्र गरीब,भिकारी असे कोटीकोटी जिवंत देव रोज उपाशीच निजतात. निर्जीव दगडातला देव माणसाला दिसतो पण माणसातला देव मात्र माणसाला दिसत नाही. असा हा माणूस आहे.देवावर श्रद्धा असावी त्याची मनोभावे पूजा करावी पण अंधश्रद्धेने वागू नये.देवदेव करायच्या नादात उपाशी राहून स्वतःच्या आत्म्याला दुखवतो.जिवंत माणूस पोटासाठी मागत असेल तर त्याला आपण देत नाही.त्याचा आत्माहि दुखावतो.आपण भेदभाव करतो. कधी भेदभावात जातीपातीचा संबंध लावतो तर कधी गरीब श्रीमंतीचे मोजमाप लावले जाते.कारण काही असो दुसऱ्याला कमी लेखण्याचा मानवाचा गन सहज वागण्यातून दृष्टीस येतो. जो माणूस दगडात देव पाहून दगडाचे दर्शन करतो तोच माणूस मातेच्या गर्भात नऊ महिने राहून जिने हे सुंदर जग दाखवले ,लहानाचे मोठे केले,स्वतः उपाशी राहून प्रसंगी बाळाला पोटभर खाऊ घातले.चांगल्या सवयीचा अट्टहास धरला तिची किंमत त्याला वाटत नाही.काही प्रसंगी तिचाही विटाळ त्याला होतो. तिला उलट बोलणे तिचा व्यवस्थित सांभाळ न करणे,असल्या कृती तो करतो हे वागणे बरोबर आहे का ? असा प्रश्न कवी प्रस्तुत कवितेत मांडतो.
       आजकाल जिवंत माणसाला माणूस म्हणण्याची सर्वांनाच लाज वाटते.जिवंतपणी कोणी विचारपूस करीत नाही पण मेल्यावर मात्र पुण्यतिथी अनेक सोहळे साजरे होतात.स्मृतिप्रीत्यर्थ अनेक कार्यक्रम आयोजित केल्या जातात.त्यापेक्षा जिवंतपणी त्याच्याविषयी आपुलकी प्रेम,माणुसकी दाखवली पाहिजे.खोटं वागणाऱ्या या लोकांचा त्याच्या भोंदुपणाचा कवीला राग येतो. कवी म्हणतो अरे तू स्वतःशी तरी खरेपणाने वागतोस का? तू स्वतःलाहि फसवणारा धोकेबाज आहेस.जिथे स्वतःच्या अंतरात्म्याच्या स्वत्वाची कदर नसते तिथे जगाचे काय?
      कवितेत कवी मा.श्रीकृष्णजी उबाळे यांनी माणसाच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक दाखवून संपूर्ण मानवजातीला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले आहे. असे महान कार्य करणाऱ्या कवीच्या आगामी कार्यास माझ्या हार्दिक शुभेच्छा..!

-- सौ.आशा पाटील,सोलापूर
(लेखिका प्रसिद्ध साहित्यिक आहेत)

Comments

  1. खूप छान ....आवडली

    ReplyDelete
  2. अतिशय मार्मिक शब्दात समाजातील दुटप्पीपणावर बोट ठेवलंत सर......खचप छान.... अभिनंदन!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'