तुकाराम यांच्या अभंगातील वात्रटिका

संत तुकाराम यांच्या अभंगातील वात्रटिका -8

ऐसें कैसे झाले भोंदू
कर्म करुनी म्हणती साधू
अंगा लावूनिया राख
डोळे झाकुनी करिती पाप

दावूनी वैराग्याच्या कळा
भोगी विषयाचा सोहळा
तुका म्हणे सांगो किती
जळो तयाची संगती...!

    संत तुकाराम यांचा उत्तम वात्रटिका वाटणारा हा एक अभंग आहे. भोंदूगिरी,फसवेगिरी,लबाडपणा,दांभिकता उघड करणारा यांचा हा शाब्दिक मार आहे. स्वतः भोंदू असून काही लोक स्वतःला साधू म्हणून घेतात आणि अनेक कुकर्म,अधर्म करतात आणि वरून पूजनीय असल्याचा डंका वाजवतात. जागोजागी या लोकांनी दुकान स्थापिले आहेत. असे लोक वरकरणी ,दिसणीला धर्माचे कपडे घालतील,अंगावर नको नको तेथे गंध लावतील,बुक्का लावतील,टिळे लावतील, अष्टगंध लावतील,ईबीत फासतील आणि प्रत्यक्षात मात्र कृती पाप्याची करतील.
या लोकांचे वरून कीर्तन अातून मात्र तमाशा असतो. यांचे दाखवायचे दात व खायचे दात भिन्न असतात. अशा लोकांनी धर्माचा ,श्रद्धेचा आपल्या फायद्यासाठी बाजार मांडलेला असतो. असे लोक साधू,बुवा,संत तसेच वेगवेगळ्या बिरुदावली  लावून मिरवत असतात. कीर्तन,प्रवचन,पोथी,पारायण हा त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय असतो.
*जागा सांगी ब्रह्मज्ञान*
*स्वतः कोरडे पाषाण* प्रत्यक्षात त्यांच्याजवळ साधुत्वाचा कोणताही गुण आढळून येत नाही. समाजही अशाच ढोंगी चमकणाऱ्या लोकांच्या मागे धरमच्या नावाने देवाच्या नावाने लोक जमा झालेले असतात. हे लोक लोकाना सांगतील सारे जग नश्वर आहे सर्व क्षणिक आहे पण स्वतः मात्र सारे ऐहिक सुख उपभोगत असतात. मांजर ज्याप्रमाणे डोळे झाकून दूध पिते त्याप्रमाणे हे लोक सर्वकाही डोळे झाकून करीत असतात. अशा लोकांचे दुटप्पी वागणे महापाप आहे.

   "दिसतं तसं नसतं" हि म्हण याठिकाणी पक्की लागू होते. स्वतःच्या नावासमोर,नावाआधी वेगवेगळ्या लांबलचक बिरुदावल्या लावून जणू खरोखर मोठे वैराग्यमूर्ती असल्याचा भास निर्माण करून समाजाच्या जीवावर जगून समाजच्चया गळ्याला फास घालण्याचे काम हे लोक करतात. स्वतः विषयसुखाचे सोहळे हे लोक भोगताना दिसतात. बाई, बाटली,संपत्ती,विदेशवाऱ्या तेथील सुख अशा सर्व प्रकारचे सुख ते भोगत असतात. यांचे मठ, घर,भारी श्रीमंताला लाजवेल अशा गाड्या, घोड्या,लाखांचे मोबाईल,खायला पक्वान्न अशी सारी व्यवस्था या लोकांकडे असते. खरं तर साधू संत
म्हणल्यावर त्याग आले पण हे फक्त भोगी असतात म्हणून तुकाराम त्यांना भोंदू म्हणतात. तुकाराम आपल्या अभंगातून शेवटी हेच सांगतात की लोकहो अशा लोकांचा संग करून तुमचे काही भले होणार नाही अशा लोकांची संगती टाळा यातच तुमचे कल्याण आहे.

    आजच्या काळात तुकारामांनी सांगितलेल्या प्रमाणे सारीकडे भोंदू लोक आढळून येतात. धार्मिक क्षेत्र असुद्या नाहीतर कोणतेही क्षेत्र असुद्या. साऱ्या क्षेत्रात फक्त भोंदू मातलेलें आहेत. करोडो भक्त असणाऱ्या तथाकथित साधूला दोन वर्षांपूर्वी लैगिंक शिक्षणाच्या आरोपाखाली अटक झाली. काही साधुकडे तर हत्यारबंद फौज आहे.
असे एक ना अनेक उदाहरणे आहेत .
काहीजण तर टीव्हीवर दरबार भरवतात त्याची लाखात फिस असते.
अशा लोकांकडे जाऊन कल्याण नाही हे तुकारामांचे स्पष्ट सांगणे आहे.
सदरील अभंगात वात्रटिका स्पष्टपणे दिसून येते.दंभावर वार, दुटप्पी वागणे,ढोंगीपणा उघडा करणे,यमक योजना या सर्व वैशिष्टनमुळे हा अभंग एक वात्रटिका असल्याचे जाणवते.

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी