शिवबा नेमका होता कसा?
शिवबा नेमका होता कसा?
--------------------------------
पुरे झाले आता मोठेपण
पुरा झाला पोकळवसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?
शिवबा म्हणजे केवळ लढाया नाही
शिवबा म्हणजे केवळ बढाया नाही
आपल्या मनातील पदार्थ तळणाऱ्या
शिवबा म्हणजे केवळ कढाया नाही
शवबासारखे वागून तुम्ही
पुन्हा निवांत भांडत बसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?
शिवबा चांगल्याची कदर आहे
शिवबा स्रियांचा आदर आहे
शिवबा केवळ राजा नाही
शिवबा मानवतेचा फादर आहे
त्यांची थोडी स्फूर्ती घेऊन
विजयी राजमुद्रेने हसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?
शिवबा केवळ गड किल्ला नाही
शिवबा केवळ हल्ला नाही
शिवबाच्या नावाने चंदा करायला
शिवबा काही गल्ला नाही
शिवबाचा गुण जगताना
जीवनात एकदातरी दिसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?
शिवबा सुरुवातीचा तोरणा आहे
शिवबा करणाऱ्यांची प्रेरणा आहे
शिवबा म्हणजे महाराष्ट्राच्या
कणाकणात भरलेली धारणा आहे
खरखर सांगा त्यांचा
किती जणांनी घेतला वसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?
शिवबा म्हणजे पुतळा नाही
शिवबा म्हणजे कोथळा नाही
शिवबाला चौकटी करायला
शिवबा एवढा उथळा नाही
त्यांचा जयजयकार करणारा
शुद्ध पाहिजे हरएक घसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?
शिवबा कुणाच्या जातीचा नाही
शिवबा धर्माच्या वातीचा नाही
त्याचा झेंडा मिरवताना समजून घ्या
शिवबा फक्त इथल्या मातीचा नाही
शिवबाच्या तेजस्वी विचारांचा
जगभर उमठलाय ठसा
मिरवणाऱ्यांना माहित आहे का
शिवबा नेमका होता कसा?
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment